रावेर : प्रतिनिधी
गेल्या १० वर्षापूर्वी मुलाचा संसार उघड्यावर पडला. पहिल्या व दुसऱ्या नातवाची प्राणज्योत त्यांच्या बालपणीचं विझली. तिसरा नातू गोविंदा हा तरी वृद्धापकाळात आपली काठी ठरेल, ही आशा उराशी बाळगून असलेल्या आजोबांच्या आशेवरही क्रूर नियतीने पाणी फेरले. तिसरा नातू गोविंदाचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला आणि वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला. क्रूर नियतीच्या या क्रूर खेळाने वाघोडकर निःशब्द झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील वाघोड गावातील श्यामराव पाटील यांना चार मुले व मुलगी असा परिवार होता. सन १९८२ मध्ये पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर एका मुलाचाही मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा मुलगा वामन पाटील याला भुवनेश्वर व हर्षल ही दोन मुले झाली. या मुलांचा बालपणीच मृत्यू झाला. अकाली मृत्यूची श्रृंखला थांबत नाही तोच २०१५ मध्ये वामन याचा वयाच्या ४० वर्षी मृत्यू झाला. वामन याचा तिसरा मुलगा गोविंदा याने वडिलांच्या मृत्यूनंतर आजोबांच्या व आईच्या संगोपनाची धुरा सांभाळत शेती फुलवली. कालांतराने गोविंदा यांचे शाहपूर येथील नेहा हिच्याशी शुभमंगल झाले. त्यांना तीन मुले झाली.
सहा महिन्यांपूर्वीपासूनच गोविंदा याला मूत्रपिंडाच्या आजाराने घेरले. त्याची प्रकृती चिंताजनक होऊन गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोविंदा उर्फ अनिल वामन पाटील यांचा वयाच्या ४० व्यावर्षी करुण अंत झाला. दोन मुले आणि तीन नातवंडे यांचा डोळ्यासमोरच झालेला मृत्यू, यामुळे श्यामराव पाटील पूर्णतः खचले. गोविंदाच्या पार्थिवाला पाणी देताना हुंदके देत आपल्या वार्धक्यातील काठीचा आधार क्रूर नियतीने हिरावल्याने अश्रूना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी वाघोडचे वैकुंठधामही निःशब्द झाले होते.