छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतान संभाजीनगर येथील नातेवाईकांना भेटून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारवरील चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या खाली जाऊन चार पाच पलट्या खाल्या. या दुर्घटनेत कारमधील माय-लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. त्यात चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने छ. संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात दाखाल केले आहे. ही दुर्घटना धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोणगाव दर्गा (ता.अंबड) जवळील सौंदलगाव फाट्यानजीक आज (दि.१९) सकाळी नऊ च्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे कि, रोहिणी अमर चव्हाण (वय ३२) आणि नुरवी चव्हाण (वय २) या मायलेकीच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कारमधील अमर बाबुराव चव्हाण (वय ४७), प्रदीप बाबुराव चव्हाण (वय ४५), विश्रांती प्रदीप चव्हाण (वय ४०) कमलबाई बाबुराव चव्हाण (वय ६०) आणि रुद्रांश प्रदीप चव्हाण (वय २) हे इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, लातूर येथील अमरदीप बाबूराव चव्हाण, व रोहिणी अमरदीप चव्हाण हे दांपत्य नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक आहेत. दरम्यान, अलीकडच्या भारत – पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ते काही दिवसांची सुटी घेऊन भारतात परतले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर (स्पंदन नगर)येथे त्यांचे बंधू प्रदीप चव्हाण यांच्याकडे पाच – सहा दिवस मुक्कामी थांबून आज सकाळी ते कुटुंबियांसमवेत कार (एम एच २० सी एस ४४२२) ने आपल्या गावी लातूर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी चालले होते. दरम्यान धुळे – सोलापूर महामार्गावर डोणगाव दर्गा (ता. अंबड) जवळील सौंदलगाव फाट्यावर येताच कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेची माहिती पाचोड येथील कल्याण टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला देण्यात आली. तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना पाचोड (ता. पैठण) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून रोहिणी चव्हाण आणि नुरवी चव्हाण या मायलेकीला मृत घोषित केले. तर उर्वरीत जखमींवर प्राथमिक उपचार करुन छ.संभाजीनगर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची नोंद गोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक किरण हावले, पो.का.दीपक भोजने करीत आहेत.