नवी दिल्ली वृत्तसंस्था : राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा व्यावसायिक बांधकामांना परवानगी देताना अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी संबंधितांना ६० दिवसांची मुदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत बांधकाम न हटवल्यास प्रशासनाकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
महामार्गाच्या कडेला अनधिकृतपणे उभारलेले ढाबे, हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गाची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुरळीतता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे.
नवीन ढाबे किंवा हॉटेल सुरू करण्यापूर्वी संबंधितांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच स्थानिक प्रशासनाच्या आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास ते अनधिकृत ठरवून हटवण्याची कारवाई केली जाऊ शकते.
या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, महामार्गालगतचे अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक बांधकामे करणाऱ्यांवर आता प्रशासनाचा कडक बडगा बसणार आहे.



