मोठी बातमी : नागपूर हिंसाचारात खानचा मास्टरमाईंड म्हणून उल्लेख !
गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असतांना नागपूर येथे दोन गटात मोठी दंगल झाली होती. आता त्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी फहीम खानचा उल्लेख मास्टरमाईंड म्हणून केला आहे. त्यामुळे तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूरमध्ये सोमवारी रात्री भयंकर हिंसाचार झाला होता. त्यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेत उपायुक्त दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांसह एकूण 33 पोलिस जखमी झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी मुघल बादशहा औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्याच्या मुद्यावरून ही घटना घडली होती. पोलिस या घटनेमागे असणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेत होत. हा शोध आता फहीम खानपर्यंत जावून पोहोचला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खान हा 38 वर्षीय व्यक्ती नागपूर हिंसाचाराला कारणीभूत आहे. त्याने लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा हिंसाचार घडला. नागपूरच्या गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमधून त्याचे नाव समोर आले. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. त्याच्याच नेतृत्वात पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. आता त्याच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. तूर्त पोलिसांनी या प्रकरणी जवळपास 46 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या दंगेखोरांना कोर्टाने 21 मार्चपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. हिंसक जमाव त्याच्याच नेतृत्वात पोलिस ठाण्याला निवेदन देण्यास गेला होता. त्याने सोमवारी सर्वप्रथम लोकांना सोमवारी सकाळी 11 वा. एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी त्याने विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात नारेबाजी केली. त्याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण त्यानंतरही फहीम खानने जमाव गोळा करून तनाव निर्माण करण्यास सुरुवात केली.
फहीम खान जमावाला हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता. पोलिस हिंदू समाजाचे आहेत. ते आपली मदत करणार नाहीत, असे तो जमावाला उद्देशून म्हणाला होता. मागील विधानसभा निवडणूक त्याने लढवली. पण त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
दुसरीकडे, नागपूर शहरातील झोन क्रमांक 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे.