जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक शासकीय विभागात लाच खोरीचे प्रमाण वाढले असतांना आता नगरभूमापन अधिकारी कार्यालयाशी संबंधित एका खासगी व्यक्तीला लाच घेताना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले. पंटरने प्लॉटवरील वारस नोंदणी व इतर कामांसाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी, हक्कसोड प्रक्रिया आणि कर्जाच्या नोंदीसाठी संबंधित नगरभूमापन अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपी अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९, रा. नगरभूमापन अधिकारी कार्यालय) यांनी लाचेची मागणी केली होती.
सुरुवातीला प्रत्येक नोंदणीसाठी ५ हजार रुपयेप्रमाणे एकूण १५ हजार रुपये आणि काम सुरू करण्यासाठी १५०० रुपये मागण्यात आले. तडजोडीनंतर एक हजार रुपयांची रक्कम ठरली. तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ४ वाजता सापळा रचत कारवाई केली.