चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळेरोडवरील विराम लॉन्समध्ये १० लाख ४१ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पिशवीची चोरी झाल्याची घटना १७ रोजी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १४ वर्षीय मुलाने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनिल निंबा पाटील यांच्या मुलीचा विवाह १७ रोजी दुपारी विराम लॉन्समध्ये आयोजित करण्यात आला होता. ९ वेगवेगळ्या प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांची कापडी पिशवी नवरदेवाची आई अंजली पाटील यांच्याकडे होती.
जेवण करताना दागिन्यांची कापडी पिशवी खुर्चीखाली ठेवली. जेवण करीत असताना चोरट्याने संधीचा फायदा घेऊन दागिन्यांची पिशवी लंपास केली. १४ वर्षीय मुलगा ही चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीत दिसले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक राहुलकुमार पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार यांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात १४ वर्षे वयोगटातील मुलाने दागिन्यांची पिशवी घेऊन जात असल्याचे दिसून आले. सुनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पो. नि. राहुलकुमार पवार स्वतः करीत आहेत