जळगाव : प्रतिनिधी
किचनमधील विजेच्या बोर्डामध्ये शॉर्टसर्किट होऊन फ्रीजला आग लागण्यासह ती घरात पसरल्याने मुलांचे जन्मदाखले, आधारकार्ड व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शिवाजीनगर हुडको परिसरात १३ फेब्रुवारी रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगरमध्ये फरिदाबी बाकरअली सैयद (५५, रा. शिवाजीनगर हुडको) यांच्या घरामध्ये शेख अफसर शेख (३५) हे भाडेकरू राहतात. ते बाहेर असल्याने त्यांचे घर बंद होते. त्यावेळी घरमालकांना घरातून अचानक धूर येताना दिसला. त्यांनी शेजारील मंडळींना बोलावून घराचा दरवाजा तोडून पाहिले असता शॉर्टसर्किटमुळे फ्रीजला आग लागलेली होती. स्थानिक नागरिकांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत वाशिंग मशिन, लाकडी कपाट, मिक्सर, गादी, चादरी, पॅन कार्ड, आधार कार्ड, मुलांचे जन्म दाखले अशी महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती.
भाडेकरुच्या घरातून धूर निघत असल्याचे घरमालकाच्या लक्षात आले त्या वेळी ही घटना समोर आली. आगीत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोकों शशिकांत पाटील करीत आहेत. संसारोपयोगी साहित्य जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.