भुसावळ : प्रतिनिधी
घरगुती गॅस काळा बाजार व त्यासाठी लागणारे साहित्य व साधनासह विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २७सिलिंडरसह जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे कि, शेख नौशाद शेख नजीर (३१, रा. नसरवंजी फाईल, भुसावळ) आणि रिक्षाचालक निलेश सुरेश चौधरी, (रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन जणांची नावे आहेत. शहरातील नसरंवजी फाईल, शिवाजीनगर भागात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ. कमलाकर बागुल, गोपाल गव्हाळे, संघपाल तायडे, सचिन पोळ, भारत पाटील यांनी केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकला. त्यात शेख नौशाद याच्या मालकीच्या टपरीमध्ये घरगुती गॅस काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी लागणारे २७ गॅस सिलिंडर, १ ऑटो रिक्षा तसेच गॅस भरण्यासाठी लागणारे साहित्य असे एकूण १,५७,०००/-रु.कि. चा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत ऑटोरिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणारा रिक्षाचालक निलेश चौधरी यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. ला अत्यावश्यक वस्तू कायदा ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात सहा ते सात ठिकाणी अवैधरित्या वाहनात गॅस भरणा करण्यात येतो त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.