जळगाव : प्रतिनिधी
सोन्यामध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून पोलिस दलातील सहकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अर्चना पाटील या निलंबित महिला पोलिस कर्मचारीने खासगी नोकरदारांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तिने ललिता दीपक येशे (४०, रा. चौघुले प्लॉट) या महिलेला चार लाखांनी गंडविले आहे. याप्रकरणी अर्चना पाटीलविरुद्ध फसवणुकीचा रामानंदनगर पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ललिता येशे यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये एका ब्युटीपार्लरमध्ये अर्चना पाटीलसोबत ओळख झाली. त्यानंतर ललिता येशे यांनाही नफ्याचे आमिष दाखवून चार लाख रुपये घेतले. त्या बदल्यात सहा महिन्यांत ते दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. सहा महिन्यांनंतरही पैसे परत न मिळाल्याने पाठपुरावा केल्याने अर्चनाने धनादेश दिला.
मात्र ती पोलिस असल्याने धनादेश बँकेत जमा करण्यास तक्रारदार महिला घाबरत होती. पैशाची विचारणा केली असता, तुला काय करायचे ते करून घे, मी पोलिस आहे, तुला गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी दिली. त्यानंतर ललिता येशे यांनी याप्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.