अमळनेर : प्रतिनिधी
कर्जबाजारी झाल्याने सुनील मधुकर पाटील (माळी) (४०) या इसमाने मध्यरात्रीच्या बुधवारी सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. येथील जिल्हा बँक शाखेच्या स्वच्छतागृहात गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. मोठा भाऊ रवींद्र आणि वयोवृद्ध आईवडील हे तीनही कुटुंब विभक्त राहत होते. परेश व निखिल या शाळकरी या दोन मुलांसह सुनील हा आठ दिवसांपूर्वीच बँकेशेजारच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला होता. बुधवारी रात्री आषाढी एकादशीनिमित्त गावात रात्री पालखी मिरवणूक होती. सुनील याने रात्री उशिरा शेजारीच असलेल्या स्वच्छतागृहात दोरीने गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी मुलांना जाग आल्यावर त्यांनी शोधाशोध केली, परंतु कुठे कामाला गेले असतील, असे समजून ते आजी- आजोबांकडे गेले होते. बँकेचे शाखाधिकारी पी. टी. पाटील यांच्या लक्षात दुपारी हा प्रकार आला. बैंक कर्मचारी व ग्राहकांनी बँकेबाहेर आरडाओरड केल्यावर ग्रामस्थ धावून आले.
पोलिस पाटील गोपाल माळी यांनी मारवड पोलिसांना माहिती दिली. बीट हवालदार सुनील तेली यांनी पोलिस पंचनामा केला. सुनील याचा चुलतभाऊ नारायण गुलाब पाटील याने मारवड पोलिसात फिर्याद दिली.