जळगाव : प्रतिनिधी
जुन्या वादातून सोहम गोपाळ ठाकरे (१८, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्यांना एमआयडीसी पोलिसांनी धुळे येथील देवपूर परिसरातून अटक केली आहे. दीक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे (२०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) याने गोळी झाडल्यानंतर तो दोन साथीदारांसह धुळे येथे आत्याच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी त्याला तेथूनच शनिवार, २ मार्च रोजी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगरातील सोहम ठाकरे व त्याच परिसरात राहणारा दीक्षांत उर्फ दादू सपकाळे या दोघांमध्ये वाद झाले होते. शुक्रवार, १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा त्याचे मित्र भैय्या राजपूत, ऋषिकेश वंजारी, सनी सोनवणे यांच्यासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा होता. यावेळी दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. दुचाकीस्वारांनी सोहमला शिवीगाळ केली. सोहमने त्यांना जाब विचारला असता, तू मी सांगतो ते ऐकले नाही तर तुझा मुडदा पाडतो, असे म्हणत गोपाळने त्याच्या कंबरेला खोचलेली पिस्तूल दीक्षांतच्या हातात दिली व दीक्षांतने सोहमवर गोळीबार करीत त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्लेखोर संशयित दीक्षांत सपकाळे हा साथीदारांसह धुळे येथील देवपूर परिसरात त्याच्या आत्याकडे असल्याची माहिती रात्री ११ वाजता पोलिसांना मिळाली. पोउनि दीपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, पोहेकॉ किरण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, छगन तायडे, गणेश शिरसाळे, ललित नारखेडे यांचे पथक धुळ्याकडे रवाना झाले. या पथकाने सकाळी सहा वाजेपर्यंत धुळ्यात शोधमोहीम राबवत सकाळी दीक्षांतसह गोपाळ चौधरी व अन्य एकाला अटक केली.