अहमदनगर : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारी नेहमीच वाढत असतांना नुकतेच अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. घरामध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह योगेश शेळके या तरुणाचा असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय योगेश आपल्याच गावात शेती व्यवसाय करत होता. रात्री ३ च्या सुमारास ही विचित्र घटना घडली. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसले होते. त्यांनी त्याला मारहाण करतच गळा चिरून त्याची हत्या केली. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे.
शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला? त्याचे कुणाशी वैर होते का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालेत. पोलिसांनी योगेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा हत्या करणाऱ्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्यांची ओळख पटली नाही असं शेजारील रहिवाशांनी सांगितलं. बेलवंडी पोलिसांकडून तपास सुरू असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पाहाणी केली आहे.