जळगाव : प्रतिनिधी
निमखेडी रस्त्यावरील दर्शन कॉलनीसह परिसरात घरफोडी करणार्या दोन आरोपींना जळगाव तालुका पोलिसांनी जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातून अटक केली. जिमाउल्ला खान अलहउल्ला खान (60) व सैय्यद अफसर सैय्यद अजगर (22) अशी अटकेतील संशयितांची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हायवे दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडीच्या दोन घटना झाल्या होत्या. यातील चोरट्यांचा शोध सुरू असताना जिमाउल्ला खान अलहउल्ला खान व सैय्यद अफसर सैय्यद अजगर यांनी ही चोरी केल्याची माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली.
शर्मा यांना संशयित गावात आल्याची कळताच त्यांनी सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे, हवालदार नरेंद्र पाटील, प्रवीण कोळी, अभिषेक पाटील व इतर कर्मचार्यांना दोघांना ताब्यात घेण्याच्या दिल्या. त्यानुसार पथकाने संशयित आरोपी जिमाउल्ला खान अलाहउल्ला खान आणि सय्यद अफसर सय्यद अजगर यांना दाणा बाजार परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.