मुंबई : वृत्तसंस्था
देशातील अयोध्या येथे प्रभू राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह देशभर पाहायला मिळतोय. या सोहळ्यावरुन राजकीय वातावरण राज्यात चांगलेच तापल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप या सोहळ्याचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनीही यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.
“अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यामुळे देशभरात आनंदोत्सव होत आहे. आम्ही सुद्धा दर्शनाला येत्या काही दिवसात जाणार आहे. मात्र काही काळे मांजर आडवे जात आहे. फालतू प्रश्न उबाठा गटाचे नेते उपस्थित करत आहेत. तिकडे आरती चालली म्हणून हे नाशिकमध्ये आरती करत आहेत. स्वतःला विधवान समजणारे रामावर प्रश्न विचारत आहे. रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार आहे,” अशी टीका संजय शिरसाट यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर जोरदार पलटवार केला. मोदींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाळासाहेबांची मंदिराबद्दल भूमिका नाकारता येणार नाही. पण यांना वाटतं आम्हाला डोक्यावर घेऊन नाचावं पण आम्ही यांना का महत्व द्यायचं? हा इव्हेंट नाही आनंदोत्सव आहे, असा टोला त्यांनी लगावलं.
दरम्यान, संजय राऊत यांनी राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप लोकसभेची तयारी करत असल्याची टीका केली होती. राऊतांच्या या टिकेवरुनही संजय शिरसाट यांनी सडेतोड उत्तर दिले. ‘आमची निवडणुकीची तयारी आहे तुमच्या पोटात का दुखतयं. यांनी मराठी माणसाची काहीच केलं नाही तरी मराठी माणसासाठी हे बोलतात,’ असा टोला त्यांनी लगावला.