मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना केले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था, श्री शनैश्वर मंदिर, चेंबूर येथे संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. राहुल शेवाळे, आ. मंगेश कुडाळकर, तुकाराम काते, अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त हर्षद काळे, संजोग कबरे, धनाजी हेर्लेकर, अलका ससाणे उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक जनचळवळ झाली आहे. टप्याटप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच राज्य स्वच्छ, सुंदर व हरित होण्यास मदत होणार आहे.
या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेचे खरे हीरो स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस-रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डीपक्लीन ड्राइव्ह ही मोहीम सुरू केली आहे.