नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक रामभक्तांची गेल्या पाच शतकांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्यदिव्य मंदिरात प्रतिष्ठापना करतील, या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नव्या नवरीसारखी सजली असून संपूर्ण देश राममय झाला आहे. सुमारे ८ हजार विशेष आमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्याचे भारतासह परदेशातदेखील बेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे विधी मंगळवारपासून सुरू झाले. पंतप्रधानांच्या हस्ते सोमवारी दुपारी प्रतिष्ठापनेचा मुख्य विधी पार पडेल. नरेंद्र मोदी सकाळी साडेदहाच्या सुमारास अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. तेथून ते थेट शरयू नदीत स्नान करण्यासाठी जातील. स्नान केल्यानंतर पंतप्रधान पूर्वद्वाराने मंदिरात प्रवेश करतील. मंदिरात पंतप्रधान मोदी सर्व विश्वस्तांना भेटतील, गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी मोदींवर १० वेगवेगळे पाणी शिंपडण्यात येईल. मोदींच्या हस्ते दहा प्रकारचे दान देण्यात येईल आणि त्यानंतरच ते गाभाऱ्यात प्रवेश करतील, सुमारे १२ वाजून २० मिनिटांनी मोदी रामललाच्या प्रतिष्ठापनेचे विधी आरंभ करतील.