जळगाव : प्रतिनिधी
चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथील एका २४ वर्षीय महिलेला मूलबाळ होत नव्हते. त्यामुळे सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) हिचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते. यात १८ तारखेलाही पती-पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला. या जाचाला कंटाळून वर्षाने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली.
सुनील मांगू पाटील (४७) यांच्या फिर्यादीवरून पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी (२९), सासरे संजय आत्माराम सूर्यवंशी (५३), सासू रेखाबाई संजय सूर्यवंशी (४८, तिघे रा. कुसुंबा), नणंद माधुरी पाटील (३२, रा. करजगाव ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत वर्षा हिच्यावर १९ रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पती, सासरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर नणंद आणि सासू फरार असल्याचे सपोनि शेषराव नितनवरे यांनी सांगितले.