भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलच्या मागे असलेल्या रेणुका जनरल स्टोअर्समधून मोटारसायकलवर आलेल्या दोन युवकांनी सिगारेट घेतली व सिगारेट घेत असतानाच दुकानदार महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन व मंगळसूत्र मंगळसूत्र लांबविले. ही घटना शनिवारी १३ रोजी दुपारी घडली. या धूम स्टाईल केलेल्या चोरीमुळे महिला वर्गात खळबळ उडाली आहे.
जामनेर रोडवर असलेल्या प्रीमियर हॉटेलच्या मागे रेणुका जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर लाल रंगाच्या मोटारसायकलवर दोन युवक आले. त्यांनी दुकानात असलेल्या विजया हरी सपकाळे (६२,रा. जामनेर रोड, भुसावळ) यांना सिगारेटची मागणी केली. सिगारेट घेतल्यावर दोघांपैकी एका भामट्याने महिलेच्या गळ्यात असलेली ६० हजारांची चेन व ३० हजारांचे मंगळसूत्र तोडत धूम स्टाईल दुचाकीवरून पळ काढला.
सपकाळे यांनी आरडा-ओरड केली मात्र भामटे पसार होण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी डीबी विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. त्यात दोन्ही भामट्यांची छबी कैद झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.