जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सिंधी कॉलनी परिसरात विक्रीसाठी तंबाखू पानमसाला साठवून ठेवलेल्या किराणा दुकान व गोदामावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत दोन लाख ४४ हजार ६८६ रुपयांचा तंबाखू पानमसाला जप्त केला. ही कारवाई १२ जानेवारी रोजी करण्यात आली. साठवणूक करणारे रमेश जेठानंद चेतवाणी, दीपक रमेश चेतवाणी व सीमरन रमेश चेतवाणी (रा. कंवरनगर) हे फरार झाले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीत एका गोदामासह किराणा दुकानात तंबाखू-पानमसाला असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, सचिन विसपुते यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर दुकान व गोदामात जाऊन पाहणी केली. यामध्ये गोदामामध्ये ९२ हजार ८९२ रुपयांचा तंबाखू पान मसाला आढळून आला. त्यासोबतच खुशी किराणा दुकानात एक लाख ५१ हजार ७९४ रुपयांचा तंबाखू-पानमसाला आढळून आला. याप्रकरणी पोकों किरण पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रमेश चेतवाणी, दीपक चेतवाणी, सीमरन चेतवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही जण फरार झाले. पुढील तपास पोउनि दत्तात्रय पोटे करीत आहेत.