आरोपींच्या तात्काळ अटकेची पत्नी मीना जगताप यांची मागणी
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या चिन्या जगताप हत्याकांडात आज पोलिसांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान , तब्बल १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे .
तत्कालीन कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अशी या आरोपींची नावे आहेत . ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता .
कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील , दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. मात्र पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला होता .
मृत चिन्या जगताप याची जगताप पत्नी मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका ( क्रमांक – १७०६ / २०२० ) दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे . चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . चिन्याला कशी मारहाण झाली याची माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिली आहे . या आधीही न्यायालयीन चौकशीदरम्यान काही कारागृह बंदी यांनी या ५ आरोपींच्या विरोधात जबाब नोंदवलेले आहेत . कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. आता १४ महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे .
दरम्यान, संशयित आरोपी चाणाक्ष आहेत, कायद्याची माहिती त्यांना आहे, त्यामुळे ते पळून जाऊ शकतात म्हणून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी मीना जगताप यांनी केली आहे.
असा होता घटना क्रम
मीना जगताप यांनी सांगितले की, एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांना मी ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात भेटायला गेले असता, शिपाई कविता साळवे यांना माझे पती कसे आहेत, असे विचारले. कविता साळवे यांनी, ते व्यवस्थित आहे. तुम्हाला भेटायचे असेल तर कोर्टाची ऑर्डर आणा असे सांगितले. त्यानंतर मिनाबाई घरी निघून आल्या. थोड्यावेळात शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून घराजवळील रहिवासी एका व्यक्तीने चिन्याचा मृत्यू झाल्याचे मिनाबाई जगताप यांना सांगितले. लागलीच मिनाबाई ह्या गजानन पाटील व रिक्षाचालक गोपाळ यांच्यासह जिल्हा कारागृहात गेल्या. तेथे एका महिला पोलीस रक्षकाने तुला काही समजते का? तुझ्या नवर्याची तब्बेत खराब झाली तर, मला समजणार नाही का? येथून निघ नाहीतर तुझ्या वाहनांची हवा सोडेल असे मिनाबाई यांना दरडावले. थोड्याच वेळात दोन पोलीस अधिकारी तेथे आले. त्यांना कळल्यावर त्यांनी मिनाबाई यांना, चिन्याची तब्बेत गंभीर असून तुम्ही गोदावरी हॉस्पिटलला जा, असे सांगितले. त्यामुळे मिनाबाई गोदावरी फोंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गेल्या, तेथे स्ट्रेचरवर चिन्या जगतापचा मृतदेह त्यांना दिसला.
मीनाबाईंनी पती चिन्या उर्फ रवींद्र यांच्या पार्थिवाची पाहणी केली असता, त्यांचे डोळे उघडे होते. कपडे चिखलाचे भरलेले व फाटलेले होते. पूर्ण शरीर ओलेचिंब झालेले होते. पाठीवर मारहाणीचे वळ होते. मारहाणीमुळे पाठ निळी-पिवळी झाली होती. डाव्या डोळ्याच्या खाली मार लागला होता. हात मनगटापासून फ्रॅक्चर झाल्याचे दिसत होते. उजवा कान व त्या मागील भाग लाल-काळा झालेला होता. ज्या पद्धतीने जेलचे पोलिस मारहाण करतात, त्या पद्धतीने पतीच्या अंगावरती मारहाणीच्या जखमा होत्या असेही मिनाबाई जगताप यांनी म्हटले आहे.
याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे याच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, याप्रकरणात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या प्रकरणात तपास केला असता त्यात चौकशी मध्ये।दोषी आढळल्या नंतर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.