अलिबाग : वृत्तसंस्था
किरकोळ वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथे उघडकीस आली आहे. मुलगा जयेश नामदेव खोत (२७) याने आई चांगुणा नामदेव खोत (६५) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश खोत याचे त्याची आई चांगुणा खोत हिच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले. संतापलेल्या जयेशने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात चांगुणा खोत जखमी झाल्या. जयेशने जखमी आईला मोकळ्या जागेत नेले. तिच्यावर पालापाचोळा टाकून तिला पेटवून दिले. गावातील लोकांना महिती मिळताच पोलिसांना कळवले. रेवदंडा पोलिसांनी तत्काळ गावात जाऊन माहिती घेतली आणि जयेशला ताब्यात घेतले. जखमी चांगुणा खोत यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आणले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जयेश खोत याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.