नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात तब्बल २२ किलोहून अधिक चांदीची तफावत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातील या प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये ४०६ किलो चांदीचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तब्बल २२ किलो ४९० ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
२५ मार्च २०२६ रोजी प्राप्त झालेल्या या तक्रारीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवले आहे. अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या आदेशानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कळवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीमुळे संशय अधिकच गडद झाला आहे. चांदी काढताना पंचनामा, अधिकृत वजन किंवा सीलबंद प्रक्रिया यापैकी कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नसल्याचे त्यांनी कबूल केले. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून नियोजित अपहार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणाविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव आणि माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी २०२६ पासून आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करत चौकशीला वेग दिला.
तक्रारदारांनी या प्रकरणात ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अपहार झालेल्या चांदीची किंमत व्याजासह वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अंतिम चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



