मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील कल्याण शहरात सध्या गुन्हेगारांची दहशत वाढत आहे. नियमित गुन्ह्याच्या काही ना काही घटना कानावर पडतच असतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले असून ते अक्षरश: जीव मुठीत धरून जगत आहेत. दरम्यान कल्याण शहरात पश्चिमेकडे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने दुर्मिळ पोपटांची विक्री होत आहे.
गुप्तबातमीतून माहिती मिळताच कल्याण वनविभागाने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी कल्याण रामबाग परिसरात छापा मारत ४ दुर्मिळ पोपटांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुकानदार आकाश गजधाने याला ताब्यात घेतले. त्याला कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आकाशची कसून चौकशी करत अधिक तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडे रामबाग परिसरात बालाजी पेटस नावाचे दुकान आहे. या दुकानात दुर्मिळ पोपट विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुकानावर छापा टाकला आणि तेथून चार पोपट हस्तगत केले. तसेच या दुकानाचा मालक आकाश गजधाने याला अटक केली. कोर्टाने आकाश गजधाने याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे . या दुकानात रोजरिंग पॅराकिट या प्रजातीचा पोपट आढळला, जो अतिशय दुर्मिळ आहे. त्यांची खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे, हे माहीत असूनही दुकानदार आकाश गजधाने याने हे पोपट विकण्यासाठी आणले होते. वन विभागाचे अधिकारी शैलेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. दरम्यान नागरीकांनी वन्य जीव पाळू नयेत असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं आहे.