धरणगाव लक्ष्मण पाटील : सा.बां. विभागाने जळगाव – अमळनेर महामार्गावर लावलेल्या फलकांवर नजर टाकली असता असलेलं गाव आणि फलकांवर असलेलं नाव याचा ताळमेळ लागत नाही. यात अजून एक उच्चांक तो काय तर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पुढे कोविड सेंटर कडे जो रस्ता जातोय तिथे चक्क ‘मेहरूण’ असे नाव पाहून माणूस चक्रावून जातो.
दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, पिंप्री – धरणगाव रस्त्यावर गिरणा निम्न प्रकल्पा अंतर्गत पाटचारी आहे. या पाटचारी वरून जाणारा रस्ता सरळ न घेता चंद्रकोर प्रमाणे तिरकस घेण्यात आला आहे. नेमकं यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी कदाचित बांधकाम विभाग प्रयत्न तर करत नाहीये अशी शंका मनात येते. त्याठिकाणी पाण्याचा प्रवाह लक्षात घेता हा रस्ता एवढा निमुळता का करण्यात आला ? पाईप च्या माध्यमातून त्याचे काम अधिक चांगल्या प्रकारे करता आले नसते का ? तिथे कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शक फलक नाहीत, यामुळे अपघात होण्याची शक्यता नाहीये का? महामार्गावर ठिकठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असली पाहिजे ती का नाहीये? असे अनेक प्रश्न सातत्याने अनुत्तरित राहतात.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज आम्ही जळगांव – अमळनेर महामार्गाच्या वर असलेल्या फलकांचा आढावा घेतला. पिंप्री ते अमळनेर दरम्यान असलेल्या गावांची नावे अतिशय गमतीशीर पध्दतीने लिहिलेली आढळून येतात जसे – भोद बु. च्या ठिकाणी भोड बु., कंडारी च्या ठिकाणी कंदारी, लोणे च्या ठिकाणी लोन, भोणे च्या ठिकाणी भोने अशी नावे आम्हांला पहावयास मिळाली. एकीकडे मराठी अस्मितेच्या नावावर राज्यात सतत बोंबाबोंब असतांना जर अशा पध्दतीने अमराठी व्यक्तींच्या माध्यमातून कामाचे ठेके चालत असतील तर महाराष्ट्रातील गावे चुकीच्या नावांमुळे नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व प्रकारांवर न थांबता धरणगाव कॉलेजच्या पुढे ‘कोविड सेंटर’ कडे जाणाऱ्या रस्त्यावर (विनंती वरून बस थांबा) या ठिकाणी ‘मेहरूण’ असा फलक पाहिल्यावर सा.बां. विभागाने धरणगाव व परिसरातील जनतेवर खूप मोठे ऋण केल्याचा भाव मनात निर्माण होतो. नेमक्या या सर्व ऋणातून जनता कशी मुक्त होणार, हा विषय येत्या काळात औत्सुक्याचा ठरेल यात तिळमात्र शंका नाही.