Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजितदादांच्या अपघाताचा तपास लवकर पूर्ण व्हावा – कृषिमंत्री भरणे
    राजकारण

    अजितदादांच्या अपघाताचा तपास लवकर पूर्ण व्हावा – कृषिमंत्री भरणे

    editor deskBy editor deskNovember 20, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील वाढती दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी केंद्र सरकारची मदत, बारामती विमानतळाचा विकास आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सुरू असलेले राजकारण, अशा विविध मुद्द्यांवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सविस्तर भूमिका मांडली. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला होत असलेल्या विलंबामुळे संभ्रम आणि गैरसमज वाढत असल्याचे सांगत, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन सत्य समोर यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भरणे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी मदतीबाबतही महत्त्वाची माहिती दिली.

    राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले की, यापूर्वी राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये आणखी सहा तालुक्यांची भर पडल्याने आता एकूण ३१० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. एनडीआरएफच्या मदतीच्या हेक्टरी दरात वाढ झाल्यामुळे राज्य सरकारला नव्या दरानुसार मदतीचा फेरप्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थिती मांडली आहे. केंद्र सरकारकडून लवकरात लवकर भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे भरणे यांनी सांगितले.

    दिवाळीपूर्वी राज्यातील सुमारे ९५ लाख ते एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ई-केवायसी तसेच सामाईक जमिनीच्या कागदपत्रांशी संबंधित अडचणींमुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या सुमारे १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरही लवकरच मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    अजितदादांच्या अपघाताचे सत्य समोर आलेच पाहिजे

    दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवर भाष्य करताना भरणे यांनी भावनिक भूमिका मांडली. अजितदादांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून या अपघाताचे सत्य १०० टक्के समोर आले पाहिजे, अशी आपली भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

    तपासाला होत असलेल्या विलंबामुळे विविध प्रकारचे संभ्रम आणि गैरसमज निर्माण होत आहेत. पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तपास लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे. चौकशी पूर्ण होऊन सत्य समोर आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा भरणे यांनी व्यक्त केली.

    ‘मफलर मॅन’ आरोपावर फडणवीसांची पाठराखण

    आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत केलेल्या ‘मफलर मॅन’ आरोपावरही भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्यासोबत फोटो काढणे किंवा लग्नसमारंभात मफलर भेट मिळणे, याचा वेगळा अर्थ काढणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आपण जवळून पाहिले असल्याचे सांगत, विनाकारण आरोप-प्रत्यारोप न करता अपघाताच्या तपासातून सत्य बाहेर येऊ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

    बारामती विमानतळासाठी १३२ कोटींचा निधी

    बारामती विमानतळाच्या सुरक्षिततेचा, धावपट्टीच्या दुरुस्तीचा आणि विकासाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या विमानतळाच्या विकासासाठी अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोठा पाठपुरावा केला होता, असे भरणे यांनी सांगितले.

    अजित पवार यांनी स्वतः विमानतळाच्या विकासासाठी अंदाजपत्रक सादर केले होते. आता राज्य सरकारने या कामासाठी १३२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    मतदार यादीतून नावे वगळताना पारदर्शकता आवश्यक

    मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबतही भरणे यांनी भूमिका स्पष्ट केली. मृत मतदारांची तसेच लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झालेल्या महिलांची नावे नियमानुसार कमी करण्यात यावीत; मात्र नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे-मुंबईसारख्या शहरांत राहणाऱ्या नागरिकांची नावे विनाकारण वगळली जाऊ नयेत, असे त्यांनी सांगितले.

    अनेक नागरिकांचे घर, शेती आणि रेशन कार्ड गावात असते, तर ते नोकरीनिमित्त शहरात वास्तव्यास असतात. अशा मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत. मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जावी, हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

    November 20, 2026

    जन्मदाताच बनला मुलांचा वैरी : चॉकलेटचे आमिष दाखवून दोन चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

    November 18, 2026

    जळगावात तलवारींचा धाक अन् गोळीबाराचा थरार : तरुणाच्या घरासमोर दोन राऊंड फायरिंग !

    November 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.