

जळगाव : प्रतिनिधी
धार्मीक कार्यक्रमानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवलेले ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जवळच्या नातेवाईकाने लंपास केले. ही घटना दि. २७ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोंबर दरम्यान पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रदीप हिम्मत राजपूत (वय ४३, रा. जिजाऊनगर) यांच्या घरात घडली. त्यांनी त्याच परिसरात राहणारा त्यांचा मावस भाऊ शुभम हिरालाल परदेशी (रा. जिजाऊ नगर) याच्यावर संशय व्यक्त केला असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस दलात हवालदार असलेले प्रदीप राजपूत यांच्या पत्नीने ३ तोळ्याचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा नेकलेस, १४ ग्रॅमचे मंगळसूत्र, ५ ग्रॅमचे कर्णफुले, ५ ग्रॅमची चेन व पेंडल, ३ ग्रॅमचे कर्णफुले असे एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने धार्मीक कार्यक्रम आटोपल्यानंतर घरातील लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्या बाहेरगावी गेल्या होत्या. दि. ३ ऑक्टोबर रोजी प्रदीप राजपूत यांनी लॉकर उघडले असता त्यात दागिने दिसले नाही. लॉकरमध्ये ठेवलेले दागिने सापडत नसल्याने राजपूत यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना मावस भाऊ शुभम परदेशी याच्यावर संशय बळावला. संशयित शुभम परदेशी हा राजपूत यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून राहत होता. लग्नानंतर तो त्याच परिसरात गेल्या वर्षभरापासून राहत आहे. दि. २७ सप्टेंबर ते दि. ३ ऑक्टोबर या दरम्यान तो व त्याची पत्न यांच्याव्यतिरिक्त राजपूत यांच्या घरी कोणी आलेले नव्हते. तसेच या दरम्यान परदेशी हा घराच्या वरील मजल्यावरील खोलीत गेल्याचे राजपूत यांच्या मुलाने पाहिले होते. त्यामुळे शुभम याच्याकडे दागिन्यांविषयी विचारणा केली असता त्याने अनेक दिवस उडवाउडवीचे उत्तरे दिले त्यानंतर वाद घालण्यास सुरुवात केली.
आधी उडवाउडवीची उत्तरे आणि नंतर वाद घातल्यामुळे राजपूत यांना त्यांचा मावस भावावरील संशय अधिकच बळावला. दरम्यान, प्रदीप राजपूत यांनी दि. १३ ऑक्टोबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शुभम परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज पाटील करत आहेत



