

कोल्हापूर : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नूतन अध्यक्षपदी महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. त्यांना १६ मते मिळाली. त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांचा पराभव केला. चुयेकर यांना १३ मते पडली. यावेळी राज्य शासनाने नियुक्त ४ स्वीकृत संचालकांची मते राजेश पाटील यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. विजयानंतर नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी संयमी भूमिका घेतली. “निवडणूक संपली असून आता राजकारण बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे. गोकुळ संस्था आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
न्यायालयीन लढाई सुरूच राहणार – सतेज पाटील
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी या निवडणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. स्वीकृत संचालकांच्या मतदानाचा हक्क आणि या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आपली न्यायालयीन लढाई कायदेशीर मार्गाने सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.



