

मुंबई : वृत्तसंस्था
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाऊबीजेच्या निमित्ताने दिवंगत अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देणारी भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘दादा, तुझ्याशिवायची ही पहिली दिवाळी आणि पहिली भाऊबीज,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टसोबत त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचे काही जुने फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत. पोस्टच्या शेवटी त्यांनी ‘मिस यू दादा’ असे लिहित अजित पवार यांची आठवण व्यक्त केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये लिहिले की, दरवर्षी दिवाळी आणि भाऊबीजेच्या दिवसाची त्यांच्यासह सर्व बहिणींना विशेष ओढ असायची. यंदा मात्र भाऊबीजेचा दिवस उजाडताच अजित पवार यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी मनात दाटून आल्या. एकत्र येणे, गप्पा मारणे आणि हसण्या-खेळण्याचे क्षण आजही डोळ्यांसमोर उभे राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बहिणींच्या घोळक्यात रमलेले अजित पवार आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण यांची आठवण सुप्रिया सुळे यांनी पोस्टमधून सांगितली. पूर्वी अगदी सहज वाटणारे हे क्षण आज किती मोलाचे आहेत, याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या दिवशी अजित पवार यांचे नसणे मनाला चटका लावणारे आहे. सर्व बहिणींना त्यांची किती आठवण येत आहे, हे शब्दांत सांगणेही कठीण असल्याचे त्यांनी लिहिले.
या पोस्टसोबत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या आठवणींमधून दोघांमधील जिव्हाळ्याचे नाते आणि एकत्र घालवलेल्या क्षणांना त्यांनी उजाळा दिला. ‘तू आमच्या मनात कायम आहेस आणि कायम राहशील,’ असे म्हणत त्यांनी पोस्टचा शेवट ‘मिस यू दादा’ या शब्दांनी केला आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टमधून भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या आठवणीने दाटून आलेल्या भावना व्यक्त झाल्या आहेत.



