

जळगाव : प्रतिनिधी
बंद दुकानाचे लोखंडी चॅनेल गेट वाकवून चोरट्यांनी दुकानाच्या मागील लाकडी दरवाजाची कडी कापून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानात ठेवलेली ६४ हजार रुपयांची रोकड घेवून चोरटे पसार झाले. ही घटना दि. २९ ऑक्टोबर रोजी पोलनपेठ परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पोलनपेठ मधील कनक फूट वेअर हे दुकाने रात्रीच्या वेळी बंद असताना अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चॅनेल गेट वाकवून आत प्रवेश केला. तसेच दुकानाच्या मागील बाजूच्या लाकडी दरवाजाची कडी कापून दुकानात घुसले. त्यांनी दुकानातून रोख ६४ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी सुयोग गजानन परिहार (३५, रा. सदोबानगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेका नंदलाल पाटील करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना तीन संशयित चोरटे कॅमेरामध्ये कैद झाले आहे. दुकानाजवळ ते पायी व परत गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.



