

जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मंगरूळ धरणातून गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात ५० हजाराच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी रावेर शहरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणामुळे वन विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश काशिनाथ जगदाळे (२७) असे कारवाई करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे रावेर येथील अर्थमूव्हर्स एजन्सीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे स्वतःचे जेसीबी मशीन आहे. तक्रारदारांच्या परिचित व्यक्तीने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ काढून त्याची वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे उपविभाग, रावेर येथून घेतला होता. धरणातून गाळ काढण्याचे संबंधित ठिकाण वनरक्षक जगदीश जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येते. या कामाच्या मोबदल्यात जगदाळे यांनी तक्रारदाराकडे जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या बदल्यात २० हजार रुपये, तसेच त्यांच्या परिचित व्यक्तीने ट्रॅक्टरद्वारे गाळाची वाहतूक केल्याच्या बदल्यात ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी २८ ऑक्टोबरला रावेर शहरातील छोरिया मार्केट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान वनरक्षक जगदाळे यांनी जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याच्या कामाच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले.
लाचेच्या मागणीची पडताळणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रावेर ते बऱ्हाणपूर मार्गावरील साईनाथ ज्यूस सेंटर येथे सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना वनरक्षक जगदाळे यांना पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अटकेसंदर्भातील पुढील कार्यवाही सुरू असून, या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथील पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस हवालदार किशोर महाजन आणि पोलीस अंमलदार भूषण पाटील, प्रणेश ठाकूर, राकेश दुसाने व मनोज पाटील यांचा सहभाग होता. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.



