Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एका पत्नीचं कुंकू पुसलं, जन्माआधीच बाळ पोरकं झालं! पाळधी-तरसोद बायपासवर २८ वर्षीय योगेशचा मृत्यू!
    क्राईम

    एका पत्नीचं कुंकू पुसलं, जन्माआधीच बाळ पोरकं झालं! पाळधी-तरसोद बायपासवर २८ वर्षीय योगेशचा मृत्यू!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 27, 2026No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील जळगाव : पाळधी-तरसोद बायपासवरील पाळधी रेल्वे पुलावर पुन्हा एकदा काळाने घाला घातला. अपघातात धरणगाव तालुक्यातील २८ वर्षीय योगेश गजमल राक्षे यांचा मृत्यू झाला. या घटनेने एका कष्टकरी कुटुंबाचा आधार हिरावला असून, सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे योगेश यांची पत्नी अवघ्या दोन महिन्यांची गर्भवती आहे. ज्या बाळाच्या आगमनाची स्वप्ने पाहत या दाम्पत्याने नव्या आयुष्याची आशा मनात जपली होती, त्या बाळाला जन्माआधीच वडिलांचे छत्र गमवावे लागले आहे.

    संसाराची स्वप्ने अधुरीच; नियतीचा निर्दयी घाव!

    योगेश राक्षे हे कानळदा रस्त्यावरील एका गोडाऊनमध्ये हमालीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या योगेश यांच्या आयुष्यात आता नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. त्यांच्या पत्नीच्या पोटात दोन महिन्यांचा गर्भ वाढत होता. कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाची स्वप्ने रंगत असतानाच काळाने असा घाला घातला की, एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले.

    आज ज्या पत्नीच्या आयुष्यात मातृत्वाचा आनंद फुलत आहे, त्याच पत्नीच्या वाट्याला पतीच्या निधनाचे असह्य दुःख आले आहे. ज्या बाळाला वडिलांनी कुशीत घेऊन मायेने वाढवायचे होते, त्याच बाळाला आता वडिलांचा चेहराही पाहता येणार नाही. जन्माला येण्याआधीच बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने या घटनेने मन हेलावून जाते.

    कष्टकरी तरुण गेला; कुटुंबाचा आधार हरपला!

    योगेश यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. कष्ट करून कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    पतीच्या निधनानंतर गर्भातील बाळाच्या भविष्याची चिंता आणि आयुष्यभराच्या सोबतीच्या विरहाचे दुःख, अशा दुहेरी संकटाला त्यांच्या पत्नीला सामोरे जावे लागणार आहे. ज्या हातांनी संसार सावरायचा होता, तेच हात कायमचे सुटले. ज्या व्यक्तीसोबत आयुष्याची स्वप्ने पाहिली, तोच जीवनसाथी काळाच्या पडद्याआड गेला.

    रेल्वे पुलावर अपघात; उपचारापूर्वीच मृत्यूची बातमी!

    पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे पुलावर हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. योगेश यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

    पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका चिंताजनक बनली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी याच रेल्वे पुलाजवळ क्रेन कोसळून दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याआधी सुमारे दोन महिन्यांपूर्वी दोनगाव येथील एका तरुणाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एका २८ वर्षीय तरुणाचा बळी गेल्याने या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

    या मार्गावर वारंवार अपघात होत असताना महामार्ग पोलीस नेमके काय करत आहेत? अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक नियंत्रण, नियमित गस्त आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जात आहेत का? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

    प्रशासनाला आणखी किती बळींची प्रतीक्षा?

    आज योगेश राक्षे यांचा मृत्यू झाला; पण त्यांच्या जाण्याने केवळ एक जीव गेला नाही, तर एका पत्नीचे स्वप्न उद्ध्वस्त झाले, एका आई-वडिलांचा आधार हरपला आणि जन्माला येण्याआधीच एका बाळाचे पितृछत्र हरवले.

    काही महिन्यांनी या जगात येणाऱ्या त्या चिमुकल्याला कदाचित प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या तोंडूनच आपल्या वडिलांची ओळख ऐकावी लागेल. वडिलांच्या बोटाला धरून चालण्याचे भाग्य त्याच्या नशिबी नसेल. त्याच्या पहिल्या हाकेला प्रतिसाद देणारे बाबा आता कधीच परत येणार नाहीत.

    योगेश यांच्या कुटुंबाला आता न्याय मिळणार का आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कंपनीबाहेर कामगाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पाळधी पोलिसांकडून तपास सुरू

    October 27, 2026

    डोळ्यांदेखत ऊस जळून खाक : साकरेतील महिला शेतकऱ्यावर संकटाचा डोंगर !

    October 27, 2026

    किनगावात पथसंचलनावरून तणाव : दगडफेक प्रकरणी १०० हून अधिक जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक !

    October 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.