

जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महाबळ परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय कंपनी कामगाराचा मृतदेह कंपनीबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना मंगळवारी (27 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. अरविंद शामराव पाटील असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहल इंडस्ट्रीज या कंपनीत गेल्या काही वर्षांपासून कामाला होते. ते जळगाव शहरातील महाबळ परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून निघाले होते. दरम्यान, कंपनीबाहेरील एका झाडाला सुती दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. सकाळी कामासाठी कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी तातडीने अरविंद पाटील यांना खाली उतरवले आणि उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
अरविंद पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरु आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



