
जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील भागदरा येथे काल सकाळी ११ वाजता मका काढण्याचे काम सुरू असताना अचानक मशीनमध्ये अडकल्याने योगेश भावालाल पाटील (वय ३७) या तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे स्वतःच्या मालकीच्या मशीनद्वारे शेतीकाम करत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, योगेश पाटील हे शेतीकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीला जोडधंदा म्हणून ते स्वतःचे मका काढण्याचे मशीनही चालवत होते. तर, भागदरा शिवारात दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते, त्यावेळी ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय खंडारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली. तर, आधीच निसर्गाने दिलेले दुष्काळी संकट त्यातच कष्ट करून कुटुंबाला आधार देणाऱ्या योगेश पाटील यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मयत योगेश पाटील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत योगेश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुले, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



