
अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील त्रिमुर्ती नगरमधील महिलेसह तालुक्यातील जानवे येथील महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जानवे येथील विजय गोविंदा कढरे यांची पत्नी रत्ना विजय कढरे यांनी १८ रोजी दुपारी दीड वाजता लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेतला होता. त्यानंतर त्यांना खाली उतरवून जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अमळनेर येथे उपचारार्थ पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करत आहेत.
दरम्यान, शिरूड नाका येथील त्रिमुर्ती नगरमधील कविता अशोक मराठे हिने १८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर घराच्या छताला लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. दरम्यान, अशोक मराठे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ते घरी परतल्यावर त्यांनी त्यांची आई चिंधाबाई यांना कविता कुठे आहे, असे विचारले. त्यांनी ती वर काही तरी काम करत आहे, असे सांगितले. परंतु, वर गेल्यावर त्यांना कविताने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल नरेश बडगुजर करत आहेत.



