
जळगाव : प्रतिनिधी
गावठी कट्टे, सात जीवंत राऊंड, सुरा, कोयते आणि मिरची पावडर सोबत घेवून अलिशान कारमध्ये दबा धरुन बसलेल्या टोळीचा दरोड्याचा प्रयत्न रामानंद नगर पोलिसांनी हाणून पाडला. ही कारवाई दि. ११ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील भवानी माता मंदिराजवळील सिल्कमिल परिसरात केली. दरोडेखोरांकडून हत्यारे जप्त केली असून ते नेमके दरोड्याच्या प्रयत्नात होते की, अन्य काही प्लॅन होता याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील भवानी माता मंदिर ते सिल्कमिल समोरील मोकळ्या जागेमध्ये अलिशान कारमध्ये काही संशयित संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांनी गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, योगेश बारी, सागर देवरे, सुमेध इंघाटे, अनिल सोननी यांचे पथक रवाना केले. हे पथक मध्यरात्रीच्या सुमारास खासगी वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सिल्कमिलकडून मानराज पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत (एमएच १९, एई १३५५) क्रमांकाची कार संशयास्पदरित्या उभे असलेली दिसली.
पोलिसांनी संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या कारजवळ गेल्यानंतर त्यातील संशयितांची चौकशी केली. परंतू कारमधील संशयीतांच्या हालचाली सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांच्यासह कारची झडती घेतली. यामध्ये त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे, सात जीवंत काडतूस, धारदार सूरा, कोयता, मिरची पावडर, दोन सुती दोऱ्या, चार मोबाईल व काळ्या रंगाचे सहा मास्क असा असा एकूण ९ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला.
कारच्या झडतीमध्ये गावठी कट्ठयांसह सशास्त्रे मिळून आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संशयित अरविंद विजय कांबळे (वय २६, रा. कासोळा ता. मंगरुरुळपिर जि. वाशिम), खुशाल गजानन बोरसे (वय ३०, रा. रामदास वाजी खडका रोड भुसावळ), सोनु महेंद्र जयस्वाल (वय २७, रा. सातेवाडी नाका वसई (ईस्ट) पालघर), रानु उर्फ ओमकार अंकुश भदरगे (वय २९, रा. शास्त्री नगर आप्पा इंदिसे चाळ ठाणे (वेस्ट) मुंबई), संदिप बबन लोंढे (वय ३५, रा. शंभरफुटी रोड) या पाच जणांना ताब्यात घेत.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली, तसेच ही सशास्त्रे कोठून व कशासाठी आणले. याबाबत चौकशी केली असता, संशयित हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली. तसेच न्यायालयाने त्या पाचही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



