
जळगाव : प्रतिनिधी
नवरात्रनिमित्त देवीच्या दर्शनासाठी वणी गडावर जाण्याचे नियोजन सुरु होते. मात्र त्यापुर्वीच सपना विकास सोनवणे (वय १८, रा. आसोदा, ता. जळगाव) या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी आसोदा येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळचे आसोदा येथील सपना सोनवणे ही तरुणी हातेड, ता. चोपडा येथे मावशीकडे शिक्षणासाठी राहत होती. तिच्यासह कुटुंबीयांना नवरात्रनिमित्त देवीच्या दर्शनासाठी वणी गडावर जायचे नियोजन केले जात होते. त्याकरीता दि १० ऑक्टोबर रोजी आसोदा येथे घरी आली होती. रविवारी पहाटे ५ वाजता सपनाच्या वडिलांना जाग आली त्या वेळी ती आईजवळ झोपलेली त्यांना दिसली. त्यानंतर वडिलांना पुन्हा झोप लागली व त्या दरम्यान सपनाने मागच्या खोलीत जाऊन गळफास घेतला. सकाळी वडील तिला बोलवण्यासाठी गेले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



