
जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमाला गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडून रोख ३६ हजार ९०० रुपयांसह सोने-चांदीचे दागिने, मोबाईल, कपडे असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार २७ सप्टेंबर रोजी गणपतीनगरात उघडकीस आला. या प्रकरणी रामांनद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉस्मेटीक व्यावसायिक तुषार गोविदा गायकवाड (३६, रा. गणपती नगर) हे २६ सप्टेंबर रोजी रात्री अजिंठा रस्त्यावर एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तोडून घरातून रोख ३६ हजार ९०० रुपयांसह सोने-चांदीचे दागिने, टी शर्ट, जीन्स, मोबाईल, बेन्टेक्सच्या अंगठ्या, कॉस्मेटीक बॉक्स असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
कुटुंबीय पहाटे घरी आले त्या वेळी हा प्रकार लक्षात आला चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते व मागील दरवाजाही उघडा होता. या प्रकरणी तुषार गायकवाड यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरूप्न अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.



