
जळगाव : प्रतिनिधी
विमानतळ रोडवर विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने ३५ वर्षीय महेश देविदास अपार या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश अपार हे नेहमीप्रमाणे विमानतळ रोड परिसरात विद्युत दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढले होते. काम सुरू असतानाच अचानक तारांमध्ये हायव्होल्टेज प्रवाह सुरू झाला. विजेच्या तीव्र धक्क्याने महेश थेट खांबावरून रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर अवस्थेत सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. महेश यांच्या निधनाची बातमी समजताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दुरुस्तीचे काम सुरू करण्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर परवानगी (एलटी/एचटी परमिट) घेतलेली असताना अचानक वीजप्रवाह सुरूच कसा झाला? असा संतप्त सवाल नातेवाईकांनी आणि सहकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. हा निव्वळ निष्काळजीपणा नसून संबंधित अधिकाऱ्यांचा थेट हलगर्जीपणा असल्याचा आरोप करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी लावून धरली आहे.
घटनेनंतर नेहमीप्रमाणे महावितरणने हात वर करत ‘प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि दोषी आढळल्यास कारवाई करू’ असा रटाळ पवित्रा घेतला आहे. तसेच मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना नियमानुसार आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, कंत्राटी कामगारांच्या जीवाशी चाललेला हा जीवघेणा खेळ कधी थांबणार आणि महेश अपार यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.



