
धरणगाव : प्रतिनिधी
साकरे शिवारात २३ रोजी सायंकाळी चार वाजता विजांच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरु झाला. दरम्यान, वीज कोसळून जवळपास १५ शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. परंतु, सर्व मजूर बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साकरे शिवारात वीज कोसळून १५ शेळ्या ठार झाल्या आहेत. आबा पाटील, गोकुळ पाटील, नारायण पारधी, भगवान पारधी, जामलाल पारधी या मजुरांच्या या शेळ्या होत्या. परंतु, सुदैवाने सर्व मजूर थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच धरणगावचे पशुवैद्यकीय अधिकारी गौरव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी शेळ्यांचा पंचनामा केला. या वेळी तलाठी संदेश महाजन, पोलिस पाटील घनश्याम पाटील, कोतवाल शीतलकुमार पवार, किशोर पाटील व शिवसेनेचे मीडिया प्रमुख गजानन महाजन हजर होते.
तर हे वृत्त कळताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते गुलाबराव वाघ तसेच तालुका प्रमुख जयदीप पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या घटनेचीम माहिती धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्ववंशी यांना दिली. तसेच मयत शेळ्यांचा पंचनामा करुन पीडित मजूरांना नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी केली आहे.



