
जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीय जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे मूळ गावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व चांदीची मूर्ती चोरून नेली. ही घटना दि. १५ ते दि. १७ ऑगस्ट दरम्यान आयोध्यानगर परिसरातील लक्ष्मीनगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरातील लक्ष्मी नगरात दीपक शंकर वराडे (वय ३७) हे वास्तव्यास असून ते शासकीय नोकरदार आहे. दि १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी गाडेगाव या मूळगावी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच कपाटातील ५० हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत, ३ हजार रुपये किमतीचा अर्धा ग्रॅम सोन्याचा ओम पत्ता, ५ हजार रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १ हजार ५०० रुपये किमतीची चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण ५९ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी दीपक वराडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



