
जळगाव : प्रतिनिधी
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगावच्या बाहेरील बाजूस सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डास-माशांच्या प्रादुर्भावाचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगराच्या वतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महापौर, उपमहापौर आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या समोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास ठिय्या आंदोलन करत आयटीआय बाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटविण्याची मागणी केली. यापूर्वीही महापौर, महानगरपालिका आयुक्त तसेच अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, प्रश्न कायम राहिल्याने अभाविपने आंदोलनाची भूमिका घेतली.
आंदोलनादरम्यान प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत पुढील ३० दिवसांत शासकीय आयटीआय बाहेरील कचरा संकलन केंद्र हटविण्याचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी परिसराची दररोज स्वच्छता, नियमित फवारणी तसेच दुर्गंधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही प्रशासनाने मान्य केले.
प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “शासकीय आयटीआय ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जागा आहे, कचरा साठविण्याचे केंद्र नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी दुर्गंधी, अस्वच्छता आणि डास-माशांच्या त्रासाला सामोरे जात आहेत. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न कायम राहिल्याने अभाविपला ठिय्या आंदोलन करावे लागले. आजच्या आंदोलनानंतर प्रशासनाने ३० दिवसांत हे कचरा संकलन केंद्र हटविण्याचे आश्वासन दिले आहे. तोपर्यंत दररोज स्वच्छता, फवारणी आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. या आश्वासनाची अंमलबजावणी होते की नाही, यावर अभाविपचे लक्ष राहील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही.”
महानगरमंत्री आर्यन भालशंकर म्हणाले, “महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांच्या समस्येची तीव्रता आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिली आहे. एक तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनाने ३० दिवसांत आयटीआय बाहेरील कचरा संकलन केंद्र हटविण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. दिलेल्या मुदतीत केंद्र हटविले गेले नाही, तर अभाविप महानगरपालिकेवर आंदोलन करेल.”
“आरोग्य आमच्या हक्काच!” “कचरा हटवा, आयटीआय वाचवा!”
अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. यावेळी प्रदेश मंत्री डॉ.वरुणराज नन्नवरे, महानगर मंत्री आर्यन भालशंकर, महानगर सहमंत्री मनोज कुंभार, ईश्वरी जोशी, स्नेहल महाजन,अमरसिंह राजपूत,वरद पंढरकर,अभाविपचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



