
जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करून आवश्यक त्या बाबींचा कृती आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान हे मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत बोढरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेश सोनवणे तसेच जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती, वर्ग-४ मधून वर्ग-३ मध्ये पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर काम करताना येणाऱ्या अडचणी, वारसा हक्काने नियुक्ती तसेच इतर विविध सेवा विषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी राज्य सफाई कामगार आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणांवर नियमोचित व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या सेवा विषयक प्रश्नांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सकारात्मक असून, प्रलंबित मागण्यांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे स्पष्ट केले. “सफाई कर्मचारी हे ग्रामीण भागातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या सेवा विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने केली जाईल,” असेही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावेळी सांगितले. बैठकीत संबंधित विभागांचे अधिकारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.



