
नायगाव फाट्यावर ठेकेदाराच्या सिमेंट मिक्सरचा कहर; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मनोज पाटील मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना भीषण अपघात झाला. मलकापूरकडून अजंदे गावाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला रस्त्याच्या कामावरील सिमेंट मिक्सरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रल्हाद मधुकर हिवरे (रा. अजंदे, ता. रावेर, जि. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, हिवरे हे दुचाकीने मलकापूरकडून आपल्या गावाकडे जात होते. नायगाव फाट्याजवळ रस्त्याचे काम सुरू असून या कामाशी संबंधित वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. याचदरम्यान मागून आलेल्या अशोक लेलँड सिमेंट मिक्सर (MH 19 CT 4817) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर हिवरे खाली कोसळले आणि मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांची वाहतूक आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करीत आहेत.



