
धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील शेतात पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून कैलास संतोष माळी (वय ३५, रा. पाळधी ता, धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास चांदसर रस्त्यावरील शेतात घडली. घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. पिके वाचविण्यासाठी शेतातील विहिरीतून पिकांना पाणी भरण्यासाठी कैलास माळी हा तरुण त्याचे पाहुण्यांसोत उक्त्याने करीत असलेल्या शेतात रविवारी सकाळी शेतात गेला होता. शेतात पाणी भरत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला. ही बाब शेतात काम करणाऱ्यांनी कैलासच्या पाहुण्यांना सांगितली. त्यांनी तात्काळ धाव घेत कैलासला गावातील दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला जळगाव येथे हलविण्यास सांगितल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा रुग्णालयात कैलास माळी यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. शवविच्छेदन झाल्यानंतर कैलास यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कैलास माळी यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचे आणि स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व तीन बहिणी असा परिवार आहे. आई मिनाबाई माळी या पाळधी खुर्द ग्राम पंचायतीच्या माजी सदस्या आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या दुर्देवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



