
धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 09033/34 उधना–मालदा स्पेशल एक्सप्रेसला धरणगाव (DXG) रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. धरणगाव येथे या गाडीला थांबा मिळावा, यासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सातत्याने मागणी, पाठपुरावा आणि प्रभावी प्रयत्न केले होते. प्रवाशांची वाढती गरज, उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या तसेच व्यापारी, नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मंडळाने हा विषय सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची अखेर सकारात्मक दखल घेत धरणगावला या महत्त्वाच्या रेल्वे गाडीचा थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या थांब्यामुळे इटारसी, जबलपूर, पटना, भागलपूर, मालदा तसेच उत्तर भारतातील विविध शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. व्यापारी, नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असून, रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने धरणगावच्या सुविधेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.
या महत्त्वपूर्ण यशामागे धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष व डीआरयूसीसी सदस्य श्री. महेंद्र शिवराज कोठारी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि प्रभावी पाठपुराव्याचा मोठा वाटा आहे. तसेच, खासदार स्मिताताई उदय वाघ यांनीही प्रवाशांच्या हिताच्या या मागणीला सकारात्मक सहकार्य व पाठिंबा दिला. रेल्वे प्रशासनाच्या पातळीवर प्रवाशांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांच्या सहकार्याचा निश्चितच फायदा झाला. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने प्रवाशांच्या मूलभूत रेल्वे सुविधांसाठी सातत्याने आवाज उठवत विविध मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. 09033/34 उधना–मालदा स्पेशल एक्सप्रेसचा धरणगाव थांबा हे या प्रयत्नांना मिळालेले आणखी एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.



