जळगाव : प्रतिनिधी
मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ३ लाखांचे मॅफेड्रोन ड्रग्ज हस्तगत करण्यात आले असून कारवाईची कुणकुण लागताच त्या दोघांना ड्रग्ज पुरवठा करणारा पेडलर भैय्या सोनवणे हा तेथून पसार झाला. पोलिसांकडून पेडलराचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कांचननगरातील घराची झाडाझडती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारील जी. एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एम.डी. ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईचे कुणकुण लागताच अंधाराचा फायदा घेत मुख्य ड्रग्ज पेडलर भैय्या सोनवणे हा पसार झाला तर घटनास्थळाहून जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचे ५६.२९ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज मिळून आले.
पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघ संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी पुरवठा करण्यासाठी आणलेले इम्ज हे भैय्या सोनवणे याने त्यांना पुरविल्याचे सांगितले. पोलिसांकडून संशयित भैय्या सोनवणेचा कसून शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी संशयित भैय्या सोनवणे याच्या घराची झाडाझडती घेतली.



