सेल्फी काढताना घडली शोकांतिका; एकाला वाचवताना तिघांचाही जीव गेला
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
मृत मुलांमध्ये मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिघेही खदाण परिसरात गेले असता सेल्फी काढताना एका मुलाचा तोल गेला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस व नागरिकांनी धाव घेतली. देवळी येथील दीपक मोरे यांनी पाण्यात उतरून तिघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे.



