यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोलीजवळील सार्वजनिक विद्यालयासमोर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार ३७ वर्षीय प्रौढ ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मयत प्रौढ हे चिंचोली येथील रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली गावातील अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सार्वजनिक विद्यालयासमोरच श्री क्षेत्र मनुदेवी फाटा आहे. या फाट्यावर दुचाकी (एमएच १९, एक्यू ३१६६) ने चिंचोली येथील विजय राजेंद्र सपकाळे (वय ३७) हे जात होते. दरम्यान, रविवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक (एमपी ०९, एचजी ९५६५) ने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सपकाळे हे जागीच ठार झालेत. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर जगन्नाथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक शेख अन्सार शेख उमर (रा. कवटल, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



