जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जनस्थळी २ जून रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.
पोलिस उपअधीक्षक बापू रोहम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका निर्जन ठिकाणी एक महिला तिच्या मित्रासोबत बसलेली होती. त्याचवेळी १४ ते १५ तरुण याठिकाणी आले. यापैकी युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोन जणांनी महिलेवर बलात्कार केला. इतर दोन जणांनी तिच्या मित्राला धमकावले. काहींनी मोबाइलवर या घटनेचे व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर त्यातील एका संशयिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलिसात सोमवारी सामूहिक बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील १५ पैकी १४ संशयितांना सोमवारी अटक करण्यात आली आहे, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



