धरणगाव : प्रतिनिधी
दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तीनजण जागीच ठार झाले. ही भीषण घटना पाळधी (ता. धरणगाव) नजीक सावदा-रिंगणगाव रस्त्यावर सोमवारी दुपारी २ वाजता घडली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये किरण बाबूलाल राक्षे-मराठे (३८, पथराड, ता. धरणगाव), चेतन पाटील (३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीवर वडील बाबूलाल राक्षे हे मागे बसलेले होते. पाळधीनजीक समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यात वरील तीनजण ठार झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीनंतर किरण, चेतन आणि प्रदीप निकम यांना मृत घोषित केले. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो पाळधी आऊटपोस्टकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. किरण राक्षे हा वेल्डिंग व्यवसाय करीत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. तर चेतन पाटील हा परिवारातील एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे.



